ग्रामपंचायत कडेपूर

महाराष्ट्र शासन

कडेपूर ग्रामपंचायतीचा देशभरात डंका केंद्राचा राष्ट्रीय ‘सुवर्ण पुरस्कार’ जाहीर

डिजिटल सेवा व ई प्रशासनात लक्षवेधी कामगिरी; जयपूरमध्ये होणार पुरस्कार वितरण सोहळा

सांगली : केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व लोक तक्रार विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये कडेगाव तालुक्यातील कडेपूर ग्रामपंचायतीची ‘सुवर्ण पुरस्कारा’साठी निवड झाली आहे. ग्रामपंचायतीने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. डिजिटल सेवा व ई प्रशासन या क्षेत्रात ग्रामपंचायतीचा गौरव झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने हे यश साध्य ‘केले. त्यांच्या प्रशासकीय कार्यकाळात यापूर्वी धुळे जिल्ह्यातील रोहिणी गावालादेखील हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कडेपूर ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना वेळेत सेवा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला.
स्वतःचे संकेतस्थळ व मोबाइल अॅप विकसित करून जन्म-मृत्यू दाखले, घरपट्टी-पाणीपट्टी भरणा, ऑनलाइन तक्रार निवारण, योजनांची माहिती व अर्ज प्रक्रिया घरबसल्या उपलब्ध करून दिली. पारदर्शक कारभारासाठी विकासकामांची छायाचित्रे, खर्चाचा तपशील व ग्रामसभेचे ठराव संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. तब्बल १ हजार ३०० प्रकारच्या सेवा डिजिटल स्वरूपात उपलब्ध केल्या आहेत. या डिजिटल उपक्रमांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली.
जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, कडेगावचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, विस्ताराधिकारी श्रीधर कुलकर्णी, सुनील लोहार व सरपंच सतीश देशमुख, उपसरपंच हणमंत गरुड, ग्रामपंचायत अधिकारी एस. डी. मुलाणी, आदींनी यासाठी परिश्रम घेतले. पुरस्कार वितरण सोहळा राजस्थानमध्ये जयपूर येथे होणार आहे. सोहळ्यात ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

ग्रामस्थांनी केला जल्लोष
पुरस्कार जाहीर होताच कडेपूर ग्रामस्थांनी जल्लोष केला. सरपंच सतीश देशमुख म्हणाले, हा पुरस्कार संपूर्ण गावाचा आहे. ग्रामस्थांना पुरस्कार समर्पित आहे. भविष्यातही ग्रामस्थांना अधिकाधिक चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न राहील.

कडेपूर ग्रामपंचायतीचे हे यश म्हणजे सांधिक कामाची पावती आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवणे हे ध्येय आहे. ग्रामपंचायतींनी याचा आदर्श घेत डिजिटल प्रशासनाकडे वळावे. सरपंच, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे परिश्रम उल्लेखनीय आहेत.
विशाल नरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी विविध उपक्रमांनी कामाचा दर्जा उंचावला आहे. प्रेरणादायी आहे. कडेपूरप्रमाणेच अन्य कडेपूरचे यश अन्य ग्रामपंचायतींसाठीही गावेही विकसित करणार आहोत. शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from ग्रामपंचायत कडेपूर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading