कडेपूर (दि. ११जानेवारी २०२५):
कडेपूर मराठी मुलांची शाळा येथे आयोजित बाल बाजार कार्यक्रमाला पालक व ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपापल्या कल्पकतेने तयार केलेल्या वस्तूंची मांडणी व विक्री करून व्यावसायिक अनुभव घेतला. त्यांच्या सर्जनशीलतेला व व्यावसायिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सतीश देशमुख यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय पालक समितीचे अध्यक्ष अमर यादव होते. प्रमुख उपस्थितांमध्ये उपसरपंच पतंगराव यादव, मुख्याध्यापिका यादव मॅडम, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच सर्व शिक्षक, पालक, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सरपंच सतीश देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करताना असे सांगितले की, बाल बाजार हा केवळ शालेय उपक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय गुण वाढवण्याचा, पैशाचे महत्त्व शिकवण्याचा, आणि स्वयंनिर्भरतेचा धडा देणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. उपसरपंच पतंगराव यादव यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे शालेय जीवन अधिक आनंददायी आणि ज्ञानमूलक बनते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हस्तनिर्मित वस्त्रप्रावरणे, खाद्यपदार्थ, खेळणी, आणि अन्य उपयुक्त वस्तू विक्रीसाठी ठेवून ग्राहकांशी संवाद साधला. पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांची खरीखुरी खरेदी करून प्रोत्साहन दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवर्ग, पालक, व विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे गावभर कौतुक होत आहे.
ग्रामपंचायत कडेपूर





















