आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार स्पर्धेत कडेपूर (ता. कडेगाव) आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील पिंपळवाडीला विभागून प्रथम क्रमांकाची घोषणा झाली आहे. दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी २० लाख रुपये देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी दिली.
गावात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन, जतन आणि संरक्षण करून समृद्ध व संपन्न गावांची निर्मिती करण्यासाठी
२०१०-११ पासून पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबविण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१६-१७ पासून स्मार्ट ग्राम योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. २१ नोव्हेंबर २०१६ पासून स्मार्ट योजनेस आर. आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार, असे योजनेस नाव देण्यात आले. या स्पर्धेत निकषानुसार गुणांकन पद्धतीने तपासणी करण्यात येते.
२०२३-२४ साठी जिल्ह्यातील तालुकास्तरीय समितीने २५ टक्के ग्रामपंचायतींची क्रॉस तपासणी केली. तपासणीनंतर प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक गुण प्राप्त ग्रामपंचायतींची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने गावात जाऊन तपासणी केली होती.
स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञान या पाच घटकांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पुरस्कारप्राप्त गावांचा मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या गावांची नावे…
तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या गावांची नावे अशी धामणी (तासगाव), शिरसी (शिराळा), कवठेपिरान (मिरज), कडेपूर (कडेगाव), बसरगी (जत), सुरूल (वाळवा), सावंतपूर (पलूस), पिंपळवाडी (कवठेमहांकाळ), खरसुंडी (आटपाडी), आळसंद (खानापूर). प्रत्येक गावाला दहा लाख रुपयांचे बक्षीस देऊन सन्मान करण्यात येणार आहे.


