कडेपूर हे स्मार्टग्राम म्हणून ओळखले जात असून गावाच्या सर्वांगीण विकासात ग्रामपंचायतीने नवनवीन उपक्रम राबवले आहेत. गावात शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, विद्यार्थ्यांसाठी १५०० हून अधिक पुस्तकांचा समृद्ध संग्रह असलेली डिजिटल लायब्ररी उपलब्ध करणे, महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने जनजागृती मोहीम राबवणे, सुसज्ज ग्रामपंचायत इमारतीमधून नागरिकांना सेवा देणे अशा अनेक कार्यामुळे कडेपूर ग्रामपंचायत आदर्श ठरली आहे. याचाच परिपाक म्हणून ग्रामपंचायतीने विकसित केलेल्या डिजिटल अॅपचे
अनावरण जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते रविवारी पार पडले. यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी, ग्रामपंचायत स्तरावरुन नागरिकांना डिजिटल
सुविधा पुरवणारी कडेपूर ही महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत आहे. या अॅपच्या माध्यमातून पारदर्शक कारभार, सुलभ सेवा आणि जलद गतीने नागरिकांच्या समस्या सोडवणे शक्य होणार आहे. त्यामुळे कडेपूर ग्रामपंचायत खऱ्या अर्थाने आदर्श ठरणार आहे, असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सरपंच सतीश देशमुख, उपसरपंच वैभव यादव, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष अमोल डांगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराचा आढावा घेतला तसेच गरोदर महिलांच्या आरोग्यासाठी हिमोग्लोबिन वाढविण्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर डिजिटल अॅपचे लोकार्पण झाले. सरपंच सतीश देशमुख यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला. या सोहळ्यास ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक शकील मुलाणी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.





