दि. १८ जानेवारी २०२५
कडेपूर ग्रामपंचायतीने स्मार्ट ग्राम स्पर्धेत कडेगाव तालुक्यात पहिला क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यानंतर जिल्हास्तरीय क्रमांक निवडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. तृप्ती धोडमीशे मॅडम यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने कडेपूर गावाला भेट दिली. त्यांच्या सोबत डेप्युटी सीओ शिंदे साहेब, कुलकर्णी साहेब, राऊत साहेब, बीडीओ साहेब व इतर अधिकारी उपस्थित होते.
गावाला भेट देताना समितीने ग्रामपंचायतीने राबवलेल्या विविध योजनांची, उपक्रमांची आणि गावातील स्वच्छता, हरित क्षेत्र, पाणी व्यवस्थापन व डिजिटल सुविधांची बारकाईने पाहणी केली. गावाने केलेल्या प्रयत्नांमुळे पाहुणे भारावून गेले आणि त्यांनी ग्रामस्थांच्या श्रमाचे व योगदानाचे भरभरून कौतुक केले.
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग:
या भेटीवेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाउ देशमुख, ग्रामपंचायतीचे सरपंच सतीश देशमुख, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध सोसायट्यांचे चेअरमन, पदाधिकारी, महिला, पुरुष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या यशाचे श्रेय संपूर्ण गावाच्या सहकार्याला दिले जात आहे.






जोरदार स्वागत:
गावाने पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने जोरदार स्वागत केले. महिलांनी उभारलेल्या रांगोळ्यांनी आणि स्वागतगीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. पाहुण्यांना पुष्पगुच्छ, श्रीफळ व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
समितीचे कौतुक:
निवड समितीच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचे विशेष कौतुक केले. स्वच्छता, जलसंवर्धन, रस्त्यांची अवस्था, झाडांची लागवड आणि डिजिटल सुविधांमुळे कडेपूरचा आदर्श इतर गावांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
जिल्हास्तरीय निवडीत उत्सुकता:
आता जिल्हास्तरीय क्रमांकासाठी निवड होणार असून, कडेपूर गावचा जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविण्याचा आत्मविश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
ग्रामपंचायतीच्या यशाबद्दल गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून, सर्वांना आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
• ग्रामपंचायत कडेपूर







