कडेगाव तालुक्याच्या विकासाच्या नकाशावर आज एक उजळणारी नोंद झाली आहे. लोकमत आणि बीकेटी टायर्स यांनी आयोजित केलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स २०२५’ मध्ये कडेपुर, चिंचणी आणि शिवणी या तीन गावांच्या सरपंचांनी जिल्हापातळीवर आपले कर्तृत्व सिद्ध करत ‘सरपंच ऑफ द ईअर’ हा मानाचा किताब पटकावला आहे.
सतीश देशमुख (कडेपुर)— वीज व्यवस्थापनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना पुरस्कार बहाल झाला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी सौरऊर्जा, वेळेवर वीजबिल भरणा, स्मार्ट एलईडी प्रकल्प अशा उपक्रमांनी गाव उजळवले.
अॅड. रमेश मदने (चिंचणी): — आरोग्य हेच खरे धन या तत्त्वावर ठाम राहून ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम केले.ग्रामीण रुग्णालय व आरोग्य विभागातील कार्यामुळे सन्मान
संदीप पवार (शिवणी) : स्वच्छतेसाठी झोकून देणारा सरपंच. गावात कचरामुक्ती, घरगुती कचरा व्यवस्थापन, शौचालय निर्मिती, स्वच्छतेबाबत जनजागृती यासाठी त्यांनी श्रम घेतले आणि गावाला स्वच्छतेच्या दिशेने पुढे नेले.
३०० अर्जांतून केवळ १३ सरपंचांची निवड, त्यातील तीन कडेगावचे!
सांगलीतील लक्ष्मणराव किर्लोस्कर सभागृहात झालेल्या या भव्य सोहळ्यात जिल्हाधिकारी अशोक काकडे,जिल्हा परिषदच्या सीईओ तृप्ती धोडमीसे, लोकमतचे संपादक सचिन जवळकोटे,सहाय्यक उपाध्यक्ष मकरंद देशमुख,शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनिस आणि वरिष्ठ उपसंपादक अविनाश कोळी यांच्या हस्ते या तिघांचा सन्मान करण्यात आला.
या पुरस्काराने कडेगाव तालुक्यातील ग्रामविकास कार्याला नवे बळ मिळाले असून, ग्रामपंचायती फक्त निर्णयाची जागा नसून परिवर्तनाची कार्यशाळा असते, हे या तिघांनी दाखवून दिले आहे.
कार्यक्रमावेळी लोकमतचे कडेगाव प्रतिनिधी म्हणून प्रत्येक यशाच्या साक्षीदार ठरलेले तालुका प्रतिनिधी प्रताप महाडीक ,पत्रकार मोहन मोहिते, पत्रकार अतुल जाधव यांच्यासह तिन्ही गावचे सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायतींचे सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






